प्लेझर बॉक्स भाग-१ व.पु.काळे मराठी पुस्तक परिचय
प्लेझर बॉक्स
भाग-१
व.पु.काळे
मराठी पुस्तक परिचय
📬
‘’वपुंच्या लेखनाला मिळालेली दाद आणि त्याला वपुंनी दिलेला प्रतिसाद म्हणजे हे पुस्तक.’’
हर्ष हुंदके आणि हुंकार ह्यांचा हा नजराणा.
हा नजराणा असंख्य वाचकांनी केलेला.
रोज कुणाचं ना कुणाचं पत्र दारासमोर रांगोळी काढत येतं.
‘तुम्ही आम्हाला ओळखत नाही, पण आम्ही तुम्हाला ओळखतो’.
ह्यासारख्या परिचयाच्या ठिपक्या-ठिपक्यांनी रांगोळी प्रगट होते.
रांगोळी काढणा-यांचे हात दिसत नाहीत आणि कधी कधी नावही कळत नाही.
तसं झालं की आठवतो तो सांताक्लॉझ?
की त्यांची भेट माझ्या दारावरच्या प्लेझर बॉक्सपर्यंत पोहोचवणारा खाकी वेषातला पोस्टमन सांताक्लॉझ?
हे कोडं सुटत नाही. जाऊ दे! न सुटू दे.
संवादाचा पूल ऐलथडीला जोडणारी प्रत्येक कमान सारख्याच तोलामोलाची.
सगळे सांताक्लॉझ.
सांताक्लॉझची पावलं आता आपोआप ऐकू येतात.
ती वेळ अचूक समजते.
पण एखादाच दिवस असा उगवतो की त्या दिवशी ती चाहूल येत नाही.
ऐन दुपारी येणारा रातराणीचा सुगंध त्या दिवशी येत नाही.
प्लेझर बॉक्स च्या निर्मितीत एक गोष्ट कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न केला आहे. निव्वळ खुषामत करणारी पत्रं किंवा संपूर्ण पत्रातला खुषामत वा बेदम कौतुक करणारा मजकूर प्रकाशित होऊ द्याययचा नाही.
ही खुषीपत्रांची पोतडी नाही. हा एक संवाद आहे.
आनंदाची देवाणघ्ज्ञेवाण आहे.
संवादाच्या गप्पा-गोष्टीच्या ओघात आपण एकमेकांबद्दल जेवढं चांगलं बोलतो तेवढं स्तुतिपर बोलणं येणं अपरिहार्य आहे.
हा पत्रव्यवहार मुळातच आवडनिवड कळण्यासाठीच निर्माण झाला आहे.
तरीसुद्धा वाचकांची पत्र काटछाट करूनच प्रसिद्ध केली आहेत.
वाचकांच्या संकोचून टाकणा-या स्तुतीने त्यांचा भाव कळतो पण संवाद पुढे सरकत नाही.
ज्या पत्रांनी आणखीच बोलायला लावलं त्या पत्रांना अग्रक्रम मिळणं अपरिहार्य होतं.
📗📘📙📖
प्लेझर बॉक्स-पुस्तकातील दुसरेच पत्र...📬
प्रिय खरे, एका जंगलात एक झरा. तो वाहता वाहता थांबला. का? कंटाळला? की अुताराला लागला? पण पाण्याच्या बाबतीत अुताराला लागणं, हेच पाण्याचं यौवन.
झरा थांबला.
मग काठावरची हिरवळ म्हणाली, ‘तू वाहत होतास म्हणून आम्हाला जीवन मिळालं!
झाडं म्हणाली, ‘तू वाहत होतास, म्हणून संगीत म्हणजे काय ते आम्हाला समजलं!
पक्षी म्हणाले, ‘तुझ्यामुळे माणसांच्या अगोदर आम्हाला आरशाचा शोध लागला’.
आभाळ म्हणालं, ‘तुझ्यामुळे आमचं पाणी नाले, ओढे, जमीन, नदी, समुद्रापर्यंत जात होतं.’
झरा पुनः वाहू लागला.
‘आपल्याला काही येत नाही’, असं जंगलात वाहणा-या पाण्याला वाटलं, की त्याला म्हणतात
‘झरे.’
आणि
माणसातल्या झ-यांना म्हणतात,
‘खरे!
प्लेझर बॉक्स
भाग-१
व.पु.काळे
मराठी पुस्तक परिचय
टिप्पण्या