द अल्केमिस्ट-किमयागार- पाउलो कोएलो - पुस्तक परिचय- मराठी
'कोणत्याही खजिन्याचा शोध बाहेर कशाला घ्यायचा, तो आपल्याशीच तर असतो,' असा संदेश देणारे हे कथानक आहे. प्रतीकं आणि शकुननांचं भान ठेवून स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील कसं राहावं, याचं मार्गदर्शन ही कादंबरी करते.
वेगळी दृष्टी देणारी आणि अंतर्मुख करणारी ही अद्भूत आणि रंजक कादंबरी.
-द अल्केमिस्ट-किमयागार

किमयागार
पाउलो कोएलो
पुस्तक परिचय- मराठी
सॅन्टिआगो नावाच्या एका मेंढपाळाची ही कथा आहे. स्पेनमधल्या त्याच्या जन्मभूमीपासून इजिप्तच्या वाळवंटापर्यंतचा त्याचा हा प्रवास आपल्या मनाचा तळ ढवळून काढतो. पिरॅमिड्सजवळ लपवलेल्या खजिन्याच्या शोधात निघालेल्या सॅन्टिआगोला प्रवासात एक जिप्सी स्त्री, स्वतःला राजा म्हणवून घेणारा वयोवृद्ध आणि एक किमयागार भेटतो. प्रत्येक जण या तरुणाला योग्य दिशा दाखवतो. तथापि, खजिना नेमका काय आहे हे कोणालाच माहीत नसतं.
वाटेत येणार्या अडथळ्यांवर तरुण यशस्वीपणे मात करू शकेल का हेसुद्धा कोणाला सांगता येत नाही. भौतिक वस्तूंच्या शोधार्थ निघालेल्या सॅन्टिआगोला स्वतःच्या अंतरंगात दडलेल्या खजिन्याचा शोध लागतो. मानवतेच्या गाभ्याला स्पर्श करणारी अशी ही उत्कट आणि प्रेरक कथा आहे.
The Alchemist
Author- Paulo Coelho
Book Review & Summary in Marathi
पुस्तक परिचय- मराठी
आपणच आहोत आपल्या जीवनाचे किमयागार
आयुष्यात प्रत्येकाची काही स्वप्न आणि ध्येय असतात, आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आत्मविश्वास असणारा व्यक्ती सर्वसामान्य वाटेनं न जाता आपली वेगळी वाट निवडतो. काही तरी मिळवण्याची आणि शिकण्याची जिज्ञासा आणि तीव्र इच्छा असल्यास परिस्थितीवर व्यक्ती सहज मात करून यश मिळवू शकतो, विजय मिळवू शकतो.
आपण काय आहोत यापेक्षा आपली स्वप्न आणि ध्येयं काय आहे यांना अधिक महत्व आहे.
पाउलो कोएलो यांनी ‘’द अल्केमिस्ट’’ या कादंबरीत स्वप्नांवर विश्वास ठेवून, त्यांना साकार करणा-या एका ध्येयवेड्या तरूणाची गोष्ट सांगितली आहे.
सॅन्टियागो चर्चमधे लोकांना मार्गदर्शन करणारा पाद्री व्हावा अशी त्याच्या वडिलांची इच्छा असते, परंतु तो मेंढपाळ होतो.
स्वप्नांत दिसलेल्या खजिन्याचा शोध घेण्यासाठी आणि स्वप्नांचा अर्थ समजावून घेण्यासाठी, सॅन्टीयागो हा शहरातील एका महिलेला त्याच्या स्वप्नांचा अर्थ विचारतो, अर्थ सांगण्याच्या अटी-शर्तीवर सॅन्टीयागो त्या महिलेला खजिन्याचा काही भाग देण्यास तयार असूनही त्याला त्या महिलेकडून योग्य मार्गदर्शन मिळत नाही.
एकदा सॅन्टीयागोच्या शेजारी एक वृद्ध गृहस्थ बसतो. तो स्वतःला सालेमचा राजा असल्याचं सांगतो. तो वृद्धही सॅन्टीयागोला त्याच्या स्वप्नांचा विचार करण्यासाठी प्रेरणा देतो. ब-याच वेळेस तारूण्यात पाहिलेल्याला स्वप्नांना पूर्ण करण्याची उमेद व्यक्तीमध्ये असते, परंतू वाढत्या वयानुसार नकारात्मक विचारांमुळे उलटच घडत असते. स्वतःच्या तीव्र इच्छेला प्रयत्नांची जोड दिली तर विश्वातील अज्ञात शक्तीसुद्धा नकळत आपल्याला मदत करते.
स्वप्नांच्या मागे जाण्यास मज्जाव होतो तो स्वतःच्याच इच्छाशक्तीचा, सॅन्टीयागो मेंढ्यांना सोडायला तयार होत नाही, ब-याचदा आपणच स्वतःच्या मर्यादा ठरवून त्यातच गुरफटून बसतो.
एके दिवशी, सॅन्टीयागो त्याच्या सर्व मेंढ्या विकतो आणि इजिप्तला खजिन्याचा शोध घेण्यासाठी निघतो. सॅन्टीयागो आफ्रिकेला पोहोचताच सॅन्टीयागोच्या पैशांची चोरी होते. सॅन्टीयागोकडे ध्येय असतं, परंतु त्याच्याकडे पुरेसे पैसे नसतात. बाजारात फिरत असताना त्याला शोभेच्या वस्तू विकण्याचं दुकान दिसतं. पोटासाठी काम मागायला आलेल्याला सॅन्टीयागोला दुकानदार काम देतो. पुढील प्रवासासाठी पुरेसे पैसे मिळेपर्यंत सॅन्टीयागो तिथेच काम करतो. सॅन्टीयागो प्रामाणिकपणे काम करून, दुकानात किरकोळ बदल करून दुकानमालकाचा फायदा करून देतो.
जीवन व्यतीत करण्यासाठी पुरेसे पैसे मिळवूनही तो स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग सोडत नाही. आर्थिक परिस्थितीच्या कारणामुळे आपण अनेक गोष्टी सोडून देत असतो. सॅन्टीयागोला कित्येक त-हेत-हेची माणसे भेटतात, परंतू तो त्याच्या तत्वांशी तडजोड करत नाही. प्रवासात एका गावात थांबलेला असताना कबिल्याच्या प्रमुखाला भविष्यातील हल्ल्याचे संकेत तो देतो. सॅन्टीयागोच्या पुर्वसुचनेमुळे सर्वांचे रक्षण होते.
बरेच दिवस राहिल्यामुळे त्या गावातील फातिमाच्या प्रेमात तो पडतो. सॅन्टीयागो त्याच्या प्रेयसीसाठी तिथेच स्थायिक होण्याचा विचार करतो, परंतु त्याची प्रेयसी त्याला स्वप्नांसाठी प्रेमात अडकून पडण्यास नकार देते. त्याला भेटलेली फातिमा उत्कृष्ट प्रेमाचे प्रतीक आहे, प्रेम माणसाला नेहमी सबळ करते, तर अंधप्रेम नेहमीच माणसाला दुर्बळ करत असते.
सॅन्टीयागोच्या धाडसाला दाद देऊन त्या गावातील एक वृद्ध मदत म्हणून त्याच्यासोबत पुढील प्रवासात जातो. प्रवासामुळे थकलेल्या त्या दोघांवर लुटारू हल्ला करून त्यांचा ऐवज काढून घेतात. वृद्ध त्या लुटारूंना सांगतो की सॅन्टीयागो एक मोठा जादूगार आहे, तो स्वतः वाळवंटात वादळ निर्माण करू शकतो. लुटारूंनी सॅन्टीयागोला तीन दिवसांची मुदत दिलेली असते, त्याने स्वतःला सिद्ध करावे किंवा आपल्या मृत्यूला सामारे जावे या व्यतिरिक्त सॅन्टीयागोकडे कोणताही पर्याय नसतो.
तो वृद्ध सॅन्टीयागोचा आत्मविश्वास वाढवतो. मनातून मृत्यूचं आणि हरण्याचं भय काढल्यास अशक्यही शक्य होतं. सॅन्टीयागो निसर्गाला आवाहन करून स्वतःला सिद्ध करतो.
कित्येक संकटांना तोंड देऊन सॅन्टीयागो एकदाचा पिरॅमिडजवळ पोहोचता. टोळीतील एक सरदार सॅन्टीयागो तेथे येण्याचं कारण विचारत त्याची खिल्ली उडवतो. टोळीतील एक सरदार सांगतो की, त्यालासुद्धा स्वप्न पडतं की, स्पेनमध्ये एका मोडक्या चर्चच्या वृक्षाखाली खजिना आहे, परंतु तो कधी त्या ठिकाणी जायचा विचार करत नाही. टोळी सॅन्टीयागोला मुर्ख समजून जातात. स्वतःवर विश्वास ठेवून केलेले काम नेहमी पूर्णत्वास जाते. स्वतःची नव्याने ओळख करून देणारं हे पुस्तक अद्वितीय आहे.
लेखकाने प्रत्येकाच्या जीवनाला सामोरे ठेवून ही कादंबरी लिहिलेली आहे असे दिसून येते. कोणतीही नवीन गोष्ट सुरू करताना, आपली प्रेमळ माणसं, गोष्टी यांच्यातच गुंतून न पडता, त्यांचा त्याग करणे, आपल्या आशा-आकांशा-महत्वाकांक्षा, स्वप्न, ध्येयं यांना लोक काय म्हणतील ह्या भावनांसोबतच, भीती, प्रेम, ईच्छा, संकटं, अडथळे, समस्या यांच्यावर आत्मविश्वास, दृढ़ संकल्प, धैर्य, उत्साह यांच्या बळावर असामान्य कामगीरी बजाऊ शकतो, कर्तृत्व गाजवू शकतो, आपली स्वप्ने साकार करू शकतो.
👉अशीच स्वप्ने व ध्येयं नसती तर दर्यावर्दी कोलंबसने जगाचा शोध लावलाच नसता,
👉जीवनात जिज्ञासेने अनुभव घेण्यासाठी साहसी व धाडसी जग प्रवासाला वास्को-द-गामा निघाला नसता,
👉महत्वाकांक्षा नसत्या तर इजिप्तची आश्चर्यचकित करणारी पिरॅमिडदेखिल बनविले गेले नसते,
👉लोक काय म्हणतील असा विचार करून जर स्वातंत्र्य सैनिक घरीच बसले असते तर आज आपण स्वतंत्र राहिलो नसतो.
समाजाने दाखवलेल्या व आखून दिलेल्या वाटेवर न जाता स्वप्नं व ध्येयं यांचा पाठलाग करताना होणारा त्रास, येणारी असंख्य संकटंही सहन करण्याची शक्ती आपली स्वप्नं आपल्याला देतात. असामान्य स्वप्न व ध्येयं असूनही आपण सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन व्यतीत करत असतो. त्यांची कारणं वर उल्लेख केल्याप्रमाणे आपणच आपली मर्यादा ठरवत असतो.
प्रत्येकाकडे स्वप्नं आणि ध्येय असतातच, परंतु प्रत्येकाकडे ती स्वप्न प्रत्यक्षात जगण्यासाठी, ध्येयं गाठण्यासाठी लागणारी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर सातत्याने प्रयत्न करायची, तयारी नसते.
प्रत्येक स्वप्न पाहणा-या व त्यांना सत्यात उतरवू पाहणा-या जिज्ञासू सर्वसामान्य व्यक्तीपासून ते सर्वसाधारण विद्यार्थ्याने ही पुस्तक अवश्य वाचन करावी.
जीवनाला खरा अर्थ प्राप्त करून देण्यासाठी आपली स्वप्नं व ध्येयं यांचा पाठलाग करून प्रत्यक्ष जीवनात स्वप्नं साकार करण्याची शक्ती, जिद्द-चिकाटी, आत्मविश्वास, बळ व प्रेरणा ही पुस्तक आपल्याला नक्कीच देईल याची खात्री वाटते.
#द अल्केमिस्ट - मराठी #किमयागार लेखक- #पाउलो कोएलो #The Alchemist by #Paulo Coelho #The Alchemist by #Paulo Coelho #Book Review & #Summary in Marathi #द अल्केमिस्ट पुस्तक परिचय- सारांश मराठी
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
टिप्पण्या