अ‍ॅनिमल फार्म -जॉर्ज ऑरवेल मराठी पुस्‍तक संक्षिप्‍त-सारांश

 जॉर्ज ऑरवेलची ही संक्षिप्‍त कादंबरी एक धडा. जगातील प्रत्‍येक राज्‍यव्‍यवस्‍थेवर विश्‍वास ठेवणा-या सामान्‍य माणसासाठीचा. हा एक धडा आहे न्‍याय, स्‍वातंत्र्य आणि समता या मूल्‍यांवर आधारित लोकशाही व्‍यवस्‍थेत अं‍धविश्‍वास ठेवणा-या प्रत्‍येक नागरिकाला.  अ‍ॅनिमल फार्म त्‍याच्‍या कथानकापलीकडेही जाऊन, ‘’एकपक्षीय मतप्रचार’’ हा कसा लोकशाहीत सामान्‍य लोकांच्‍या विचारधारांनाही ताब्‍यात ठैवू शकतो, हे दाखवून देतो.

लेख  साभार -अद्वैत शुक्‍ल  advaitshukla411@gmail.com (पुण्‍यनगरी)

 

अ‍ॅनिमल फार्म

-जॉर्ज ऑरवेल

मराठी पुस्‍तक संक्षिप्‍त-सारांश 

 

Animal Farm
by George Orwell

Book Review-Summary in Marathi

 

पंछी ये समझते हैं चमन बदला है,

हॅंसते हैं सितारे कि गगन बदला है|

शमशान की कहती है मगर खामोशी,

है लाश वही सिर्फ क़फन बदला है|

-उदयभानु हंस (दस मुक्‍तक)

२५ जून १९०३ ला भारतात जन्‍म झाला एरिक आर्थर ब्‍लेअर उर्फ जॉर्ज ऑरवेल या प्रसिद्ध इंग्रजी निबंधकार आणि साहित्यिकाचा आणि त्‍याने पुढे जाऊन आधुनिक इंग्रजी साहित्‍यात एक नवे पर्व सुरू केले.  जॉर्ज ऑरवेल याने आपल्‍या लिखाणातून सोपी आणि सरळ इंग्रजी भाषा वापरण्‍यावर भर दिला.  

इंग्रजीतून भपकेदार शब्‍द आणि परकीय भाषेतील वाक्‍प्रचार काढून टाकण्‍यात यावे आणि इंग्रजी भाषा ही सामान्‍य माणसाला कळेल, अशी असावी, असा विचार त्‍याने मांडला (संदर्भःपॉलिटिक्‍स अ‍ॅंड इंग्लिश लॅग्‍वेजः ऑरवेल, १९४६.  ‘’व्‍हाय आय राइटया त्‍याच्‍या १९४६ ला लिहिलेल्‍या एका निबंधात जॉर्ज ऑरवेल म्‍हणतो,

‘’माझी अशी इच्‍छा होती की, माझ्या लिखाणातून गेल्‍या दहा वर्षांत राजकीय लेखनाला कलेचे रूप देता यावे.’’  पुढे तो म्‍हणतो, मी जेव्‍हा लिहायला बसतो, तेव्‍हा माझ्यासमोर असते ते म्‍हणजे एक ‘’असत्‍य’’ जे मला (माझ्या लिखाणातून) उघडकीस आणायचे असते.’’

आपल्‍या अवघ्‍या ४६ वर्षांच्‍या आयुष्‍याच्‍या अखेरच्‍या दशकात लिहिलेल्‍या दोन पुस्‍तकांमुळे त्‍याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली, ती म्‍हणजे-अ‍ॅनिमल फार्म’ (१९४५) आणि १९८४ (नाइंटीन एटी फोर)१९४९. या दोन्‍ही कादंब-या २१ व्‍या शतकात आजही काळाची प्रत्‍येक कसोटी पार करून प्रत्‍येक वाचकास प्रासंगिक वाटतात.  त्‍यातील अ‍ॅनिमल फार्मही कादंबरी ऑरवेलने बोल्‍शेविक क्रांतीची भ्रामक बाजू उघडकीस आणण्‍यासाठी लिहिली.  त्‍यातील अ‍ॅनिमल फार्मया पुस्‍तकाच्‍या युक्रेनियनआवृत्‍तीच्‍या प्रस्‍तावनेत ऑरवेलने आपल्‍या पुस्‍तकाची पार्श्‍वभूमी सांगितली आहे.  तो म्‍हणतो

मी स्‍पेनहून परत आल्‍यानंतर, सोविएत (रशिया) ची खोटी बाजू सगळ्यांना समजेल, अशा आणि इतर भाषांत सहज अनुवाद करता येईल, अशा सोप्‍या भाषेत लिहिण्‍याचे ठरवले. 

पण जेव्‍हा मी एका दहा वर्षांच्‍या मुलाला एक मोठी घोडागाडी चालवताना आणि त्‍याच्‍याकडील चाबकाने घोड्यांना मारताना पाहिले, तेव्‍हा मला या कादंबरीचे कथानक सुचले आणि त्‍यानंतरच मी (कार्ल) मार्क्‍सचा वर्ग सिद्धांत प्राण्‍यांच्‍या दृष्‍टीकोनातून लावून पाहिला’ 

(संदर्भः ब्‍लूम्‍स मॉडर्न क्रिटिकल इंटरप्रिटेशन्‍स ऑफ जॉर्ज ओरवेल्‍स अ‍ॅनिमल फार्म: संपादक हॅरॉल्‍ड ब्‍लूम). 

अ‍ॅनिमल फार्मही नुसती कादंबरी नसून, तत्‍कालीन सोविएत रशियाच्‍या वरकरणी साम्‍यवादीवाटणा-या व्‍यवस्‍थेवर केलेला हल्‍ला आहे.

युरोपमध्‍ये रशियाच्‍या राजकीय धोरणाबाबत जे सर्वसामान्‍यांमध्‍ये गैरसमज होते, त्‍या सोविएत मिथचा’ (Soviet Myth) खरा चेहरा अ‍ॅनिमल फार्मसंक्षिप्‍त कादंबरीच्‍या स्‍वरूपात पुढे आणते. अ‍ॅनिमल फार्मआपल्‍या उपहासात्‍मक कथानकात अनेक रूपकांचा उपयोग करून पटवून देते की, राज्‍यव्‍यवस्‍था जरी बदलली, तरी सर्वसामान्‍यांच्‍या आयुष्‍यात काही बदल होत नाही.  कादंबरीतील मॅनॉर फार्मम्‍हणजे क्रांतीपूर्व रशिया, फार्मचा मालक जेान्‍स म्‍हणजे प्राणी म्‍हणून जी डुकरे पुढाकार घेतात, ती म्‍हणजे बोल्‍शेविक क्रांतीकारकज्‍यांनी रशियन क्रांती घडवून आणली.  कथेच्‍या सुरूवातीला ज्‍याच्‍या स्‍वप्‍नामधून क्रांतीची कल्‍पना सर्व प्राण्‍यांसमोर मांडली जाते, तो प्रमुख म्‍हणजे लेनिन’.

मनुष्‍यप्राणी आपल्‍याला समान वागणूक देत नाही आणि म्‍हणून त्‍याच्‍या अन्‍यायकारक फार्ममध्‍ये आपण आपले असे स्‍वतःचे राज्‍य प्रस्‍थापित करायचे, अशी प्रेरणा एक डुक्‍कर सर्व प्राण्‍यांना देते, परंतु क्रांतीच्‍या आधीच त्‍याचा मृत्‍यू होतो आणि क्रांतीची जबाबदारी येते पुढच्‍या दोन डुकरांवर.  या दोघांच्‍या नेतृत्‍वाखाली क्रांती यशस्‍वी होते आणि सर्व प्राण्‍यांना समान हक्‍क प्राप्‍त होतात.  या क्रांतीनंतर मॅनॉर फार्मचे नाव बदलून अ‍ॅनिमल फार्म करण्‍यात येते आणि क्रांतीतून पुढे ओली सात मूल्‍ये हे प्राणी एका भिंतीवर लिहून ठेवतात.  स्‍नोबॉलआणि नेपोलियनया दोन डुकरांमध्‍ये संघर्ष सुरू होतो.  ऑरवेलच्‍या कादंबरीतील ही दोन डुकरे, म्‍हणजे ट्रॉट्सकी आणि स्‍टॅलिन.

ज्‍याप्रमाणे रशियामधून स्‍ट्रॉट्सकीला काढून टाकण्‍यात आले होते, त्‍याप्रमाणेच स्‍नोबॉललादेखील नेपोलियन अ‍ॅनिमल फार्ममधून हाकलून देतो आणि मग पसरतात स्‍नोबॉलबद्दलच्‍या अनेक अफवा.  ज्‍याप्रमाणे स्‍ट्रॉट्सकीला देशद्रोही संबोधले गेले, त्‍याच प्रकारे स्‍नोबॉललादेखील संबोधले जाते.  

अ‍ॅनिमल फार्ममधील प्रत्‍येक प्राणी तत्‍कालीन रशियामधील एकेका वर्गाचे प्रतिनिधित्‍व करतो.  कथेतील डुकरे म्‍हणजे तत्‍कालीन तथाकथित बुद्धिमान बोल्‍शेविक.  कथेतील स्‍व्कीलर हे डुक्‍कर स्‍टॅलिनच्‍या प्रचारकांचे प्रतिनिधित्‍व करते.  बॉक्‍सर हा घोडा म्‍हणजे अविरत कष्‍ट करणारा सामान्‍य माणूस, जो आपल्‍या नेत्‍याचे अंधपणे अनुसरण करतो. कुत्रे म्‍हणजे स्‍टॅलिनच्‍या गुप्‍त पोलिसांची सेना.  

मेंढरे म्‍हणजे आपल्‍याला जे सांगितले जाईल, तेच खरे आणि त्‍याची कोणतीही शहानिशा न करता आणि त्‍याचा अर्थ न समजता त्‍याचे पालन करणारे नागरिक.  

 (संदर्भः अ‍ॅनिमल फार्म: अ‍ॅन अ‍ॅलेगोरी ऑफ रेव्‍होल्‍युशन- व्‍हॅलेरी मेयर्स)

पुढे नेपोलियन कशी सत्‍तेची धुरा स्‍वतःचया हातात घेतो, डुकरे कशी हळूहळू स्‍वतःच क्रांतीच्‍या सात मूल्‍यांचे उल्‍लंघन करू लागतात आणि ती मूल्‍ये आपल्‍या सोयीनुसार बदलू लागतात, बाकी प्राण्‍यांमध्‍ये नेपोलियनबद्दल कशी आदराची भावना त्‍यांच्‍या नकळत रूजवली जाते, इथून ते शेवटी डुकरेदेखील (बोल्‍शेविक) कसे हळूहळू माणसांसारखेच (आधिच्‍या राजेशाहीसारखी) होऊ लागतात याची कथा म्‍हणजे अ‍ॅनिमल फार्म’..!

परंतु सर्व प्राणी समान आहेतइथपासून ते सर्व प्राणी समान आहेत, पण काही अधिक समान आहेतइथपर्यंतचा अ‍ॅनिमल फार्मचा प्रवास हा काही फक्‍त रशियामधील फसलेल्‍या साम्‍यवादापुरता मर्यादित नाही.  जॉर्ज ऑरवेलची ही संक्षिप्‍त कादंबरी एक धडा आहे.  अ‍ॅनिमल फार्ममधील नेपोलियनप्रमाणेच प्रत्‍येक राज्‍यव्‍यवस्‍थेमध्‍ये सत्‍तेवर येणारे नवीन सत्‍ताधारी आधीचे सत्‍ताधारी कसे चुकीचे होते आणि त्‍यांना विरोध करणारे (स्‍नोबॉल) कसे राजद्रोही आहेत, हे सामान्‍यांना पटवून देतात. 

विरोध वाढू नये म्‍हणून आपले प्रचारक (स्‍व्कीलर) सतत जनतेमध्‍ये आपल्‍या कामाबद्दल खोटा आढावा देत राहतील आणि जनतेच्‍या अल्‍पस्‍मृतीचा फायदा घेऊन आत्‍ताची परिस्थिती ही आधीच्‍या परिस्थितीपेक्षा उत्‍तम आहे, हे ते ठसवत राहतील, याची खबरदारी घेतात. 

हळूहळू ज्‍या मूल्‍यांचा आधार घेऊन आणि ज्‍या राज्‍यव्‍यवस्‍थेचा आधार घेऊन ते सत्‍तेवर आले, ती मूल्‍ये आणि ती राज्‍यव्‍यवस्‍थाच बदलायचा प्रयत्‍न करू लागतात.   बघता बघता आधीचे सत्‍ताधारी आणि नंतरचे सत्‍ताधारी ह्यांच्‍यात फार फरक उरत नाही.  शेवटी अ‍ॅनिमल फार्ममधील बाकी प्राण्‍यांमध्‍ये, दोन पायांवर चालणा-या डुकरांत आणि माणसांत फरक करू न शकणा-या सामान्‍य लोकांकडे हे सर्व निमूटपणे पाहण्‍याशिवाय दुसरा काही पर्यात उरत नाही.

‘’हाऊ टू थिंक पॉलिटिकली’’ (लेखकः ग्रेमी जेरार्ड, जेम्‍स मर्फी) ह्या पुस्‍तकात म्‍हटल्‍याप्रमाणे राजकारण’ (Politics) हे शक्‍ती (Power) आणि न्‍याय (Justice) ह्यांचा छेदनबिंदू आहे.  अशी शक्‍ती जी न्‍याय्य आहे आणि असा न्‍याय जो सशक्‍त आहे... न्‍यायाविना शक्‍ती/सत्‍ता ही स्‍वतःच्‍याच नागरिकांविरूद्ध वापरली जाते आणि शक्तिविना न्‍याय हा आपल्‍या नागरिकांच्‍या हक्‍कांचे संरक्षण करू शकत नाही.

जोपर्यंत जगातील राज्‍यव्‍यवस्‍थांमध्‍ये शक्‍ती आणि न्‍याय यांच्‍यात समतोल राखला जाणार नाही, आणि जोपर्यंत सत्‍ताधारी आपल्‍या सत्‍तेचा/शक्‍तीचा अन्‍याय्य वापर करत राहतील, तोपर्यंत ऑरवेलच्‍या सामान्‍य माणसालानिमूटपणे बघत राहण्‍याखेरीज गत्‍यंतर उरणार नाही आणि जोपर्यंत एक युटोपीयन/आदर्श समाजाची स्‍थापना होत नाही, तोपर्यंत ऑरवेलचे अ‍ॅनिमल फार्मप्रासंगिक वाटतच राहील.

 

सरकार-शासन-प्रशासन-राज्यकारभार व्यवस्था कशी चालते :


 

 

पुस्‍तकाचे नांवः अ‍ॅनिमल फार्म

लेखकः जॉर्ज ऑरवेल

मराठी पुस्‍तक संक्षिप्‍त-सारांश

#Animal Farm by George Orwell in Marathi #Book Review #Summary #अ‍ॅनिमल फार्म लेखक-#जॉर्ज ऑरवेल # अ‍ॅनिमल फार्म मराठी पुस्‍तक संक्षिप्‍त- #सारांश

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

👉ई-वाचनालयावर ईतर उत्‍कृष्‍ट पुस्‍तक सारांश वाचाः

सॅपियन्‍स- मानवजातीचा संक्षिप्‍त इतिहास

हॅबिट- आपल्‍या दैनंदिन सवयींवर आधारित

१२ ब्रेन रूल्स- डॉ. जॉन मेडिना मेंदूचे नियम

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive