भंगलेला हिमालय (द फ्रॅक्‍चर्ड हिमालया)- निरूपमा राव -पुस्‍तक परिचय-समीक्षा मराठी

 बर्फाचे तट कोसळले...! भारताच्‍या धोरणाने लष्‍करी आक्रमण होऊ शकते, याची कल्‍पना चिन्‍यांनी दोन जणांना दिल्‍याचे द फ्रॅक्‍चर्ड हिमालया या पुस्‍तकात आहे.  जुलै 1962 मध्‍ये चिनी उपमंत्री झांग हन्‍फू यांनी आर.के.नेहरू यांना जिनेव्‍हात ही कल्‍पना दिली, तसेच ब्रह्मदेशाचे कंबोडियातले राजदूत यांनाही ही कल्‍पना चिन्‍यांनी दिली होती.  हे सगळे संकेत आपल्‍याला दिसले नाहीत. त्‍यामुळे चीनने अचानक हल्‍ला केला हे आपले म्‍हणणेही खोटे आहे.

                                                              

भंगलेला हिमालय

(द फ्रॅक्‍चर्ड हिमालया)

लेखिका- निरूपमा राव

पुस्‍तक परिचय-समीक्षा मराठी

 


लेख साभारः रविंद्र कुलकर्णी, पुण्‍यनगरी, बुकशेल्‍फ
संपर्कः ९८१९२४७०९३
, kravindrar@gmail.com

 

THE FRACTURED HIMALAYA

India Tibet China -1949-1962

Author- Nirupama Rao

#Marathi Book Review of THE FRACTURED HIMALAYA #Nirupama Rao Book Review in Marathi
#
THE FRACTURED HIMALAYA MARATHI

 

दोन शब्‍द

भारताच्‍या माजी परराष्‍ट्र सचि, चीनमधल्‍या माजी राजदूत वा परराष्‍ट्र खात्‍यात विविध पदांवर काम केलेल्‍या निरूपमा राव यांचे द फ्रॅक्‍चर्ड हिमालयाअर्थात भंगलेला हिमालयहे भारत व चीन यांच्‍या १९४८ पासूनच्‍या राजनैतिक संबंधांचा, ज्‍याचे परिवर्तन १९६२ च्‍या भारतासाठी नामुष्‍की ठरणा-या लष्‍करी पराभवात रूपांतर झाले, त्‍याचा विस्‍तृत आढावा घेणारे पुस्‍तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.

विषय किचकट असला, तरी पुस्‍तक रटाळ झालेले नाही.

ब-याच प्रमाणात चीनपासून अलिप्‍त राहून कारभार करणा-या तिबेटवर १९५० च्‍या ऑक्‍टोबरमध्‍ये चिनी सैन्‍याने ताबा मिळवला.   त्‍यावेळच्‍या ल्‍हासामधल्‍या दूतावासात अधिकारी असलेल्‍या सुमुल सिन्‍हा यांनी दिल्‍लीला जो निरोप पाठवला त्‍याने परिस्थितीची पूर्ण कल्‍पना आपल्‍याला येते.  ते म्‍हणाले,

चिनी सैन्‍य तिबेटमध्‍ये शिरले आहे. आता हिमालय अस्तित्‍वात नाही.  नोव्‍हेंबरमध्‍ये योगी अरविन्‍दानी याचा खरा अर्थ चीन आता भारताला कधीही धोका उत्‍पन्‍न करू शकतो असे म्‍हटले.

नंतर चिनी दूतावासासमोरी झालेल्‍या एका निदर्शनात डॉ.आंबेडकरांनीही भाग घेतला.  पटेलांचे धोरणही पंडितजीपेक्षा वेगळे होते.  पण त्‍यांचा लगेच मृत्‍यू झाला.

या सर्व घडामोडीतल चीनचे पंतप्रधान झौ एन लाय व भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू ही प्रमुख पात्रे.

आपल्‍याकडून पंडितजींना दोष देण्‍याचा प्रघात पडून गेला आहे.  त्‍यातून पंडितजींचे एक स्‍वप्निल, भोळसट असे चित्र आपल्‍यापुढे उभे करण्‍यात येते.  ते बरोबर नाही, असे लेखिकेने साधार लिहिले आहेह.  चीनसारख्‍या मोठ्या देशाबरोबर मैत्री हा भोळसट पणाचा भाग नव्‍हता, तर त्‍यांच्‍या परराष्‍ट्र धोरणाचा होता.  जे चुकत गेले, असा निष्‍कर्ष या पुस्‍ताकाच्‍या वाचनाअंती निघतो.

पंडीतजी चीनबद्दल कायम शंकित होते. याची अनेक उदाहरणे लेखिकेने दिलेली आहेत.  १९५० च्‍या ऑक्‍टोबरमध्‍ये चिनी सैन्‍य तिबेटमध्‍ये शिरल्‍यावर त्‍याच तिबेटचा दक्षिण भाग समजल्‍या जाणा-या तवांग भागात जाऊन त्‍यावर नियं‍त्रण प्रस्‍थापित करण्‍याचे आदेश आसाम रायफल्‍सला जानेवारी १९५१ ला देण्‍यात आले.  हे काम करणा-या भारतीय सैन्‍यातल्‍या मणिपुरी नागा मेजरचे आपल्‍याला विस्‍मरण झाले आहे.

मेजर बॉब खतिंग २०० सैनिक व ६०० हमाल बरोबर घेऊन १४,२०० फूट उंचीवरील सेला पास ओलांडून घेऊन तवांग भागात गेला व आज त्‍याच भागाचे अरुणाचल प्रदेश नावाचे राज्‍य आहे.  लडाख भागाचा विचार केला, तर १९४८ पासून भारताने तिथे हवाईपट्ट्या बांधायला घेतल्‍या.  १९४८  ला लेहमध्‍ये, १९५१ ला कारगिलमध्‍ये, १९५६ थोईसे, १९५९ ला चुशूलमध्‍ये, दौलत बेग ओल्‍डी १९६० ला, तर फुकचे येथे १९६१ ला हवाई पट्ट्या बांधून तयार होत्‍या.

१९६२ मध्‍ये युद्धाला तोड फुटण्‍याआधी वाटाघाटीने हा प्रश्‍न सोडवण्‍याचा दोन्‍ही बाजूंनी बराच प्रयत्‍न करण्‍यात आला.  १९१४ मध्‍ये त्‍यावेळी चीनपासून अलिप्‍त असलेला तिबेट, तत्‍कालीन ब्रिटीश सरकार यांच्‍यात सिमला येथे एक करार झाला. ज्‍याला भारत सरकार आजही धरून असते.

पण त्‍याला त्‍यावेळी उपस्थित असलेल्‍या चिनी प्रतिनिधींनी, चिन अत्‍यंत दुबळा असतानादेखील या कराराला मान्‍यता दिली नाही.  हे लक्षात घेण्‍याजोगे आहे.  शिवाय परदेशाबरोबर असा स्‍वतंत्र करार करण्‍याचा तिबेटला अधिकार होता काय, हाही एक प्रश्‍न आहे. त्‍यासाठी चीनच्‍या अधिपत्‍याखाली प्रदेश व प्रभावाखालील प्रदेश अशीही फोड या पुस्‍तकात ठिकठिकाणी आहे.

क्विंग घराण्‍यापासूनचे चीनचे नकाशे नेपाळ, भूतान, सिक्‍कीम, आजचा अरूणाचल प्रदेश व ब्रह्मदेशाचा उत्‍तर भाग हे सारे चीनचा भाग म्‍हणून दाखवत होते. वाटाघाटीत दोन्‍ही देशांनी आपल्‍या सीमा सिद्ध करण्‍यासाठी टीम तयार केल्‍या.  लडाख भागतल्‍या आपल्‍या दाव्‍याबद्दल पंडितजींना प्रथम शंका होती.  पण सर्वपल्‍ली गोपाल यांनी गोळा केलेले ऐतिहासिक पुरावे पाहिल्‍यावर पंडितजी आपल्‍या भूमिकेपासुन तसूभरही मागे हटले नाहीत.

सर्वपल्‍ली गोपाल, जी.एन. राव व चिनी भाषातज्‍ज्ञ व्‍ही.व्‍ही. परांजपे यांनी ६०० पानी अहवाल तयार केला.  १९६० मध्‍ये झाऊ एन लाय व नेहरू यांच्‍यात सात खासगी बैठका झाल्‍या; पण त्‍यातून काही निष्‍पन्‍न झाले नाही.  २० ऑक्‍टोबर १९५९  ला लडाख मध्‍यल्‍या कोन्‍काला पास येथे पाच पोलीस चिनी सैन्‍याने मारल्‍यावर भारतीय जनमत प्रक्षुब्‍ध झाले व प्रथम अवघड असलेली कुठलीही घेवदेव यानंतर अशक्‍य बनली व लडाखमधून चिन्‍यांना बाहेर फेकून देण्‍याची मागणी जोर पकडू लागली. 

यातून फॉरवर्ड पॉलिसी या धोरणाचा जन्‍म झाला, ज्‍यात सीमावर्ती प्रदेशात अत्‍यंत पुढे जाऊष्‍न लष्‍करी ठाणी उभी करून गस्‍त चालू करण्‍याचा निर्णय झाला. या ठाण्‍यांना मदत करण्‍याच्‍या कुठल्‍याही सोई नव्‍हत्‍या;  पण भारताच्‍या या धोरणाने लष्‍करी आक्रमण होऊ शकते, याची कल्‍पना चिन्‍यांनी दोनजणांना दिल्‍याचे पुस्‍तकात आहे.

जुलै 1962 मध्‍ये चिनी उपमंत्री झांग हन्‍फू यांनी आर.के.नेहरू यांना जिनेव्‍हात ही कल्‍पना दिली, तसेच ब्रह्मदेशाचे कंबोडियातले राजदूत यांनाही ही कल्‍पना चिन्‍यांनी दिली होती.  हे सगळे संकेत आपल्‍याला दिसले नाहीत. त्‍यामुळे चीनने अचानक हल्‍ला केला हे आपले म्‍हणणेही खोटे आहे.

युद्ध होणार नाही, असे भारतीय सरकारमधील, पंडितजींपाूसन सर्वांचेच मत होते आणि आपण काही पाहण्‍याचेच नाकारले. १९५९ मधल्‍या तिबेटच्‍या उठावात भारताचा हात असल्‍याचा दाट संशय चीनला होता.  चीन बरोबरच्‍या राजकीय लढाईत आपल्‍याला यश मिळाले नव्‍हतेच.  नंतर ते लष्‍करी बाबतीतही ते आपल्‍याला मिळाले नाही.

अर्थात आज या सा-या परिस्थितीत बराच फरक पडला आहे.  आपण चीनबरोबर वाटाघाटी करण्‍यात अनेक पटीने कुशल झालो आहोत.  आपली लष्‍करी सज्‍जता अद्ययावत आहे. सीमावर्ती प्रदेशातले रस्‍त्‍यांचे जाळे भक्‍कम होत आहेत;  पण त्‍याचबरेाबर हा प्रश्‍नही आणखी जटील झाला आहे.

अनेक दिवस भारत पाकिस्‍तान प्रश्‍नात अलिप्‍त रहाणारा चीन पाकिस्‍तानकडे झुकू लागला आहे. या वाटाघाटीच्‍या इतिहासाच्‍या अभ्‍यासातून लाभलेल्‍या दृष्‍टीने व दूरदर्शीपणाने व भावनेपक्षा तर्कशुद्ध दृष्‍टीनेच हा प्रश्‍न सुटू शकतो या लेखिकेच्‍या मतावर दुमत होण्‍याचे कारण नाही.

पुस्‍तकाची भाषा ही दुस-याला कमी न लेखणरी, भानेचा उन्‍माद न पसरवणारी, त्‍याचबरोबर आपला मुद्दा न सोडणारी आहे. भारताने आपल्‍या सीमा एकतर्फी निश्चित केल्‍या आहेत, हे कुठल्‍याही राजकीय पक्षाला सांगणे शक्‍य नाही, ते स्‍पष्‍ट सांगण्‍याचा धाडस, निरुपमा राव यांनी दाखवले याबद्दल त्‍यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे.

तांत्रिकदृष्‍ट्या भारताचे म्‍हणणे कदाचित पूर्णपणे बरोबर नसेल;  पण याच हिमालयीन सीमांनी भारत अनादी काळापासून निश्चित केला आहे व या सीमांचे संरक्षण, गरज पडल्‍यास रक्‍ताच्‍या शेवटच्‍या थेंबापर्यंत करण्‍याची गरज आहे, असे निरुपमा राव यांनी पंडितजींना उधृत करत म्‍हटले आहे.

 न सांगण्‍याजोगी गोष्‍ट, ६२ च्‍या पराभवाची शोकांतिका या मेजर जनरल शशिकांत पित्रे यांच्‍या पुस्‍तकाबरोबर वाचायचे हे पुस्‍तक आहे.

 समाप्‍त


टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive