कुटुंबसंस्थेचा नैसर्गिक इतिहास- स्कॉट फोर्बस | A NATURAL HISTORY OF FAMILIES

“A Natural History Of Families” हे पुस्तक या कुटुंबांच्या इतिहासाबद्दल आणि त्यातले नाते कसे बदलत गेले याबद्दल सांगतं. ही कथा जगभरातील लोकांच्या कुटुंबांवर आधारित आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागात लोक कसे राहत आणि कसे नाते जपतात, याचे कोणतेही एकसारखे नियम नसतात असं या पुस्तकातून समजू शकतो.

 

कुटुंबसंस्थेचा नैसर्गिक इतिहास
A NATURAL HISTORY OF FAMILIES

 


     हे पुस्तक कुटुंबाचा नैसर्गिक इतिहास हा खूप महत्त्वाचा विषय सांगतं. प्रत्येक कुटुंब म्हणजे फक्त प्रेमाचा समूह नाही, तर त्यात संघर्ष आणि स्पर्धाही असते.  

निसर्गात अनेक प्राणी जसे शार्क, हायना, आणि पेलिकन यांची मुले कधी कधी त्यांच्या भावंडांना मारतात. बुंगी आणि उंदीर देखील बाळं मारतात. हे का होते? कारण त्यांच्या कुटुंबातील लोकांमध्ये अन्न, जागा, आणि संसाधनांसाठी स्पर्धा असते.  

गर्भधारणेदरम्यान आतल्या बाळांना आईकडून किती अन्न मिळेल असा संघर्ष सुरू होतो. काही वेळा आईचे शरीर स्वतः खराब बाळं गर्भातून बाहेर टाकते.  

हे सर्व वर्तन कसे आणि का होते हे समजावून सांगण्यासाठी लेखकाने प्राण्यांचे आणि मानवी जीवनाचे उदाहरण दिले आहेत. त्यामुळे हे पुस्तक सोपं आणि मनोरंजक आहे.  

आयुष्यात कुटुंब म्हणजे फक्त प्रेम नाही, तर निसर्गाने दिलेला एक संघर्ष आहे, असं या पुस्तकातून समजतं.  

अनेकदा घरातले कोणीतरी कधी का रागावतात? कधी का भांडतात? यालाही काही कारणं असतात! तुम्हालाही असा काही प्रश्न पडला का कधी? 

 

मानवी समाजाचा महत्त्वाचा घटक म्हणजे 'कुटुंब' ही संस्था. ती जर सशक्त व प्रगतिशील असेल तर तो समाज आदर्श व संपन्न जीवनाकडे निश्चितपणे वाटचाल करू लागतो. आई-वडील व मुलं हे कुटुंब या संस्थेचे प्रमुख घटक. त्यांच्यातला परस्पर विश्वास, प्रेम व सुसंवाद हा अत्यावश्यक, पण जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी कुटुंबांमध्ये 'विसंवाद'च जास्त आढळतो. या विसंवादाच्या परिणामी मुलांच्या संगोपनाची हेळसांड होऊन कुटुंबंच्या कुटुंबं उद्ध्वस्त होतात. 

 

पूर्व प्रकाशित लेख साभार:
डॉ. सुरेश चांदवणकर
chandvankar@yahoo.com

     

     यामागच्या संभाव्य भौगोलिक, समाजशास्त्रीय, राजकीय, आर्थिक व मानसिक कारणांचा मागोवा सातत्यानं घेतला जात असतो; पण याच्या मुळाशी प्राणीजीवनातली आदिम 'कुटुंब' व्यवस्था आहे, असं निरीक्षण स्कॉट फोर्बस यांनी 'अ नॅचरल हिस्टरी ऑफ फॅमिलीज' या पुस्तकात मांडलं आहे.

     प्रो. फोर्बस कॅनडातल्या विनिपेग विद्यापीठात जीवशास्त्राचे प्राध्यापक असून वीसेक वर्षं निसर्गातल्या 'कुटुंब व्यवस्थे'चा अभ्यास करताना विशेषतः पक्ष्यांच्या कुटुंबजीवनातली सखोल निरीक्षणं त्यांनी अतिशय चिकाटीने नोंदविली आहेत. काही मासे, कीटक, पाणकोळी (Pelicans) आपल्याच भावंडांना ठार का मारतात? 

      बीटल्ससारखे किडे व उंदीर आपलीच पिले का मारतात? प्रौढ मातांच्या पोटी अनेकदा जुळी किंवा व्यंग असलेली मुलं का जन्मतात? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या ध्यासातून लेखकाला अनेक धक्कादायक निष्कर्ष हाती लागले. त्यांचा माणसांच्या कौटुंबिक जीवनाशीही अगदी जवळचा संबंध आहे. 

     दोनेकशे पानांच्या या छोटेखानी पुस्तकात एकूण १३ प्रकरणं आहेत. 'कुटुंब' हे एक मिथक व मिथ्या बाब आहे की काय, अशीच सुरुवात करून लेखक एकूण विवेचनाचा रोख स्पष्ट करतो. शेवटच्या प्रकरणात (Debunking the Family Myth ) लेखकाने 'कुटुंबव्यवस्था खरोखरीच समाजधारणेत महत्त्वाची आहे का?' असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचं कारण वर म्हटल्याप्रमाणे 'विसंवादी सूर' आळवणारी कुटुंब खूप मोठ्या संख्येनं वाढत आहेत हे आहे, पण हे असं का घडतंय? एका वाक्यात, 'लेकुरे उदंड झाली' हेच यामागचं प्रमुख कारण. 

    माणसात व पशुपक्ष्यांमध्ये याबाबत ते दोन स्वतंत्र प्रकरणांत विविध पक्ष्यांच्या जीवनाचा अभ्यास करून मांडलेलं आहे. आवडत्यांवर प्रेमवर्षाव, तर नावडत्यांची अवहेलना यातून भावंडांमधली भांडणं सुरू होतात. रम्य हिरव्या कुरणांमध्ये सूक्ष्म जीवांचा जीवनमरणाचा झगडा सतत चालू असतो. मारामारी, हिंसा व कुटुंबसंस्थेचा नैसर्गिक इतिहास यात अगदी समानता आहे. 

      काही अपवाद वगळता मनुष्यमात्रांमध्ये स्त्रीच्या पोटात एका वेळी एकच गर्भ वाढत असतो; मात्र बहुतेक प्राणी व पक्षी एका वेळी पिलावळच निर्माण करतात. त्यात काही सशक्त तर बरीचशी दुबळी. त्यातच कौटुंबिक संघर्षाची बीजं पेरलेली आढळतात. 

    कितीही इच्छा असली तरी माता-पित्यांना इतक्या पिलांना अन्न, निवारा व मायेचा उबारा पुरवणं अशक्यच असतं. त्यातूनच सशक्त ती टिकतात, दुबळीही जगायचा आटोकाट प्रयत्न करतात, तरी प्रसंगी भावंडांकडूनही मारून टाकली जातात. याची कारणमीमांसा एका प्रकरणात दिली आहे. प्राणीजगतात सशक्त मुलंच आईवडिलांची का लाडकी असतात व त्यांचीच निवड कशी केली जाते शास्त्राच्या आधारे जी निपुत्रिक जोडपी उतारवयात कृत्रिम गर्भधारणा करून घेतात त्यांना हा सावधगिरीचा इशाराच आहे. 

एकाहून अधिक वेळा कृत्रिम गर्भधारणा, क्लोनिंग याबाबत संबंधितांना सावध करण्याची गरज आहे, असं लेखक आग्रहानं सांगतो. आधुनिक मानवानं पुनरुत्पादनाच्या क्षेत्रात चालविलेल्या प्रयोगांविषयी त्याचा सूर काहीसा नाराजीचा आहे. 


A NATURAL HISTORY OF FAMILIES
Scott Forbes

 

शांततामय सहजीवनही तिथं अव्याहत चालूच असतं, हे दाखवत कीटकांच्या जीवनसंघर्षाचं शहारे आणणारं वर्णन लेखकानं केलं आहे.

जुळ्या व व्यंग घेऊन जन्माला आलेल्या पिलांवर शास्त्रीय माहिती यात असून यातली वस्तुस्थिती मनुष्यालासुद्धा लागू होते, असं लेखकाचं सांगणं आहे. गर्भधारणेनंतरच्या काही दिवसातच मादीचं शरीर तिच्याही नकळत गर्भाची सतत परीक्षा घेत असतं. त्यात काही विकृती असेल तर तो जीव गर्भपाताच्या माध्यमातून सरळ बाहेर फेकला जातो. पण ही क्षमता तरुण वयातच अधिक असते. उतारवयात मात्र विकृती घेऊन किंवा जुळी, तिळी व बहुतेकदा दुबळी मुलं जन्माला येतात. 

पण त्यामागे ecology या विषयातला अनेक वर्षाचा सखोल अभ्यास आहे. माणूस हासुद्धा त्याचाच भाग आहे, याचं प्रो. फोर्बस यांनी नेमकं भान ठेवलेलं आहे म्हणूनच प्रत्येक प्रकरणाची सुरुवात प्राचीन काळातल्या, इतिहासातल्या किंवा आधुनिक काळातल्या मानवी जीवनाशी संबंधित घटनेनं केली आहे. उदा. प्राचीन स्पार्टन लोकांच्या साम्राज्यात ज्येष्ठ नागरिकांची समिती नवजात अर्भकांची तपासणी करून दुबळी, सव्यंग, रोगट बाळं भारभूत ठरवत असे व ती गावाबाहेर टाकून दिली जात, अशी माहिती एका प्रकरणाच्या अगोदर वाचावयास मिळते.


'जुळ्यां' वरच्या प्रकरणाची सुरुवात चार्ल्स डार्विन व त्याच्या कुटुंबाच्या माहितीने होते व एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातल्या युरोपियन समाजातल्या कुटुंबाची माहिती मिळते. चार्ल्स व त्याची पत्नी एम्माची वडिलोपार्जित मालमत्ता व संपत्ती तीन लाख पौंड इतकी होती. त्यामुळे जगण्यासाठीचा संघर्ष त्यांना करावा लागला नाही. त्यांना १८३९-१८५६ या काळात दहा मुलं झाली. पैकी तीन लहान वयातच दगावली. १८५८-५९ मध्ये त्यानं "ओरिजिन ऑफ स्पेशीज"' हा निबंध प्रसिद्ध केला. बालमृत्यूंचं सामान्यपणे ३० टक्क्यांहून अधिक प्रमाण तिथल्या समाजात त्या काळी होतं. आता दीडशे वर्षांनंतर ते एक टक्क्याच्या खाली आलं आहे. पण अफगाणिस्तान, नायजेरिया, अंगोला, सिएरा, लिऑन इथं ते ३० टक्क्यांच्या वर गेलं आहे. 

 

    निसर्गातल्या कुटुंबजीवनात मादीचा सहभाग हा नरापेक्षा निश्चितपणे मोठा व महत्त्वाचा आहे. म्हणूनच की काय, पुस्तकाच्या मुखपृष्ठावर निसर्गावस्थेतली स्त्री तिच्याच उंचीच्या पक्ष्याला कवेत घेऊन उभी आहे. बाजूलाच बागडणाऱ्या छोट्या मुलांवर तिची नजर खिळलेली आहे. भवताली साप, किडे, कबुतर, तसेच पानं, फुलं व झाडंझुडुपंही दिसताहेत. 


अगदी डाव्या बाजूला डोंगर, त्याच्या पायथ्याशी दुमजली घर, नदीवरचा पूल, रस्ता व त्यावरची माणसं व पाळीव प्राणी अशी आधुनिक मानवी जीवनाची साधनं दिसताहेत. सारा स्टेंगले (Sarah Stengle) यांनी हे अत्यंत समर्पक असं मुखपृष्ठ बनवलं असून त्याचं प्रेरणास्थान हे १५०४ चं लिओनार्दो द विंचीचं एक पेंटिंग (Leda and her two sons Caster and Pollux) आहे. पुस्तकाचा आशय मुखपृष्ठावर अशा प्रकारे क्वचितच यथार्थपणे प्रकट होतो !


पूर्व प्रकाशित लेख साभार:
डॉ. सुरेश चांदवणकर
chandvankar@yahoo.com



अनॅचरल हिस्टरी ऑफ फॅमिलीज 
लेखक: स्कॉट फोर्बस; 
प्रकाशक : प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी प्रेस (२००५) 
पाने : २३१; 
किंमत : २८ डॉलर्स (१८ पौंड)

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive