कम्बख्त निंदर- नरेंद्र मोहन- मराठी-पुस्तक परिचय
माझ्यातल्या 'मी'ला स्वतःपासून वेगळं करून पारखण्याचं वेगळं कौशल्य आहे. हिंदी साहित्यिक नरेंद्र मोहन यांची आत्मकथा 'कम्बख्त निंदर'कडे या दृष्टीने पाहता येई.
कम्बख्त निंदर
नरेंद्र मोहन
मराठी अनुवाद
यशोधरा काटकर
पुस्तक परिचय
माझ्यातल्या 'मी'ला स्वतःपासून वेगळं करून पारखण्याचं वेगळं कौशल्य आहे. हिंदी साहित्यिक नरेंद्र मोहन यांची आत्मकथा 'कम्बख्त निंदर'कडे या दृष्टीने पाहता येईल.
डॉ.नरेंद्र मोहन हे हिंदी साहित्यातील महत्वाचं नाव आहे. त्यांना आपण महत्वाचे कवी, समीक्षक आणि नाटककार म्हणून ओळखतो. त्यांचं सृजनात्मक तसेच शैक्षणिक क्षेत्रातही महत्वाचं योगदान आहे.
त्यांच्या नावावर 'हद हो गई यारों' आणि 'मंच अंधेरे में' या लोकप्रिय नाट्यकृतींसोबतच अनेक महत्वाची पुस्तके आहेत. 'किम.जिन्ना' हे त्यांचं नाटक विवादास्पद होतं बाणि या नाटकानंतरच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि सृजनात्मकतेचा नवीन पैलू समोर आला.
नरेंद्र मोहन हे भारत-पाकिस्तान फाळणीच्या दाहात प्रत्यक्ष होरपळलेल्यांपैकी एक होते. काही कविता आणि कथा लिहून आत्मलुब्ध होणा-या साहित्यिकांचे समकालीन असूनही नरेंद्र मोहन, व्रतस्थ पद्धतीने साहित्यसेवा करणारे साहित्यिक होते.
नरेंद्र मोहन यांनी प्रत्यक्ष अनुभवलेला काळ, त्यातून केलेली साहित्यनिर्मितीबद्दलचा दस्तावेज त्यांच्या 'कम्बख्त निंदर' आणि 'क्या हाल सुनावा' या दोन खंडातील आत्मकथेतून समजून घेता येतो. 'कम्बख्त निंदर' हा नरेंद्र मोहन यांनी लिहिलेल्या आत्मकथेचा पहिला खंड. त्यात त्यांच्या लाहोर येथील जन्मापासून ते दिल्लीत येऊन स्थायिक होण्यापर्यंतचा प्रवास नोंदवला आहे.
भारत-पाकिस्तान विभाजनापूर्वीच्या लाहोर शहरातील साधारण कुटुंबात जन्माला आलेल्या मुलापासून ते साहित्यक्षेत्रातील ख्यासतनाम लेखक बनण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. फाळणीपूर्वी रोवल्या गेलेल्या अस्वस्थेच्या बीजातून धुमसत गेलेला काळ, त्यातली अस्वस्थता धुमसणं नरेंद्र मोहन यांनी अनुभवलंय.
या अनुभवाशी समानधर्मा असणारा मंटोही त्यांना त्यामुळेच जवळचा होता. दोघांच्या काळाशी संबंधित दुःखाची जातकुळी एकच होती. मंटोशी त्यांच्या आत्मीय आणि साहित्यिक नात्यालाही किनार होती.
माझ्यातल्या 'मी' ला स्वतःपासून वेगळं करून पारखण्याचं वेगळं कौशल्य आहे. अशा पद्धतीचे अनुभवकथन प्रत्यक्षात फार होताना दिसत नाही, त्याला अपवाद म्हणून 'कम्बख्त निंदर'कडे बघता येईल. नरेंद्र मोहन यांनी त्यांच्या अनुीावांची दाहकताही कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता अत्यंत संयमाने व्यक्त केली आहे. बालपणी शरणार्थी कॅम्पमध्ये लुटी-पुटीचे नाटक खेळणा-या निंदर दिल्लीत येऊन नराट्यप्रेमी आणि लेखक होतो.
त्याला दिल्लीतील प्रत्येक दृश्यातलं नाट्य जाणवतं. प्रत्येक घटनेचं रंगमंचीय स्वरूप दिसतं. रंगमंचावरचं नाट्य आणि दिल्लीतील राजनीतिक घटनाक्रमामध्ये अद्भूत साधर्म्य जाणवतं. नरेंद्र मोहन यांच्या संदर्भातील अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांनी लेखक म्हणून जी प्रसिद्धी प्राप्त केली ती केवळ आणि केवळ त्यांच्या सृजनात्मक निर्मितीच्याच बळावर.
मूळ हिंदीत 'किताबीघर प्रकाशन' यांनी प्रकाशित केलेल्या या आत्मकथेच्या पहिल्या खंडाचा अनुवाद यशोधरा काटकर यांनी उत्तम केला आहे. असं पुस्तक मराठीत येणं हीच महत्वाची बाब आहे. हिंदीतील सगळी भाषिक वैशिष्ट्य आत्मसात करून त्याचा दरवळ मराठीतीलच पुस्तक वाटावे असा बेमालूमपणे पोहोचवला आहे. अनुवादक म्हणून हे मोठं यश आहे.
पुस्तकाचे नांवः कम्बख्त निंदर
लेखकः नरेंद्र मोहन
अनुवादकः यशोधरा काटकर
प्रकाशकः मेहता पब्लिशिंग हाऊस
KAMBAKTH NINDAR (Marathi)
लेख साभारः अंजली अंबेकर, दै.लोकमत, मंथन, पुस्तक परिचय
समाप्त
इतर संबंधितः
.jpg)
टिप्पण्या