जाहिरातींचे अद्भूत विश्‍व- पांडेपुराण- जाहिराती आणि मी-पीयूष पांडे मराठी पुस्‍तक परिचय/समीक्षा

जाहिरातींचे अद्भूत विश्‍व. आपल्‍याला टी.व्‍ही. वर एक दोन मिनिटे दिसणा-या जाहिरातींमागे किती मोठा विचार असावा लागतो आणि किती लोकांचे कष्‍ट असतात, हे लेखक पीयूष पांडे आपल्‍या ‘’पांडेपुराण’’ या पुस्‍तकातून सांगतात.

पांडेपुराण

जाहिराती आणि मी

लेखक- पीयूष पांडे

मराठी अनुवाद- प्रसाद नामजोशी

मराठी पुस्‍तक परिचय/समीक्षा

 
वर्ष १९८८. भारताच्‍या ४१ व्‍या स्‍वातंत्र्य दिनाचे लाल किल्‍ल्‍यावरून थेट प्रक्षपित होणारे सर्व भारतीयांनी ऐकले ‘’मिले सुर मेरा तुम्‍हारा ...  त्‍या वेळेला ते गीत ऐकणा-यांच्‍या मनात या गीताने कायम घर केले.   १९८८ मध्‍ये लोक सेवा संचार निगमद्वारे विकसित करण्‍यात आलेल्‍या आणि सूचना मंत्रालय यांनी प्रसिद्ध केलेल्‍या या आविष्‍काराची सुरुवात दूरदर्शनवर झाली आणि लवकरच ते भारताच्‍या विविधतेतील एकतेचे आणि एकात्‍मतेचे राष्‍ट्रीय गीत बनले...! 
पीयूष पांडे यांची एक प्रसिद्ध जाहिरात
मागे वळून पाहता असे दिसते की, या गीताला भारतीय जनमानसात आजही एक अनन्‍यसाधारण स्‍थान आहे.  प्रभावी जाहिरातींचा काय परिणाम असू शकतो ते या गाण्‍याने दाखवून दिले.

प्रत्‍येक माणसाच्‍या मनात घर करण्‍याची जितकी ताकद एखाद्या पुस्‍तकात किंवा चित्रपटातअसते, तितकीच किंवा कदाचित त्‍याहून अधिक ताकद असते जाहिरात या माध्‍यमात.  अगदी थोड्या कालावधीच्‍या या जाहिराती आपल्‍याही नकळत आपल्‍यावर परिणाम करत असतात.  ब-याचचदा त्‍या आपल्‍या दैनंदिन जीवनातील घटनांचे संदर्भच बनत जातात. 

डिटर्जंट पावडरीच्‍या आणि नंतर राष्‍ट्रीय साक्षरता मिशनच्‍या जाहिरातीसाठी वापरण्‍यात आलेले ‘’पूरबसे सूर्य ऊगा’’ हे गाणं असो किंवा टेलिकॉम कंपनीच्‍या जाहिरातीतील लहान मुलगा आणि त्‍याचा पग कुत्रा असो किंवा खाद्यतेलाच्‍या कंपनीची, आपल्‍या रुग्‍णालयात असणा-या नातवासाठी घरचे जेवण आणणा-या आजीची जाहिरात असो, त्‍या आपल्‍या मनात कायमच घर करतात. 

एवढंच नाही तर समाजाचा दृष्टिकोन अमूलाग्र बदण्‍याचे कामही या जाहिराती करतात.  टी.२० क्रिकेटवर टीका होत असतानाही, ते लोकांना स्‍वीकारायला लावून त्‍याबद्दल उत्‍सुकता निर्माण करता येऊ शकते हे आयपीएलच्‍या जाहिरातींनी दाखवून दिले.   

  • जाहिरातींमुळे सत्‍तापालटदेखील होऊ शकतो हे २०१४ साली ‘’अबकी बार...’’ किंवा ‘’जनता माफ करणार नाही’’ यासारख्‍या एका राजकीय पक्षाच्‍या जाहिरातींनी दाखवून दिले. 
  •  या व अशा अनेक जाहिरातींमागे असणारा आणि जाहिरात क्षेत्रातील ८०० पेक्षा अधिक पुरस्‍कार मिळालेला चेहरा म्‍हणजे ‘’पीयूष पांडे’’.  
  • आपल्‍या या भन्‍नाट आणि अद्भूत अशा जाहिरात विश्‍वाची तोंडओळख ते आपल्‍या ‘’पांडेपुराण’’ या पुस्‍तकात करून देतात.  ‘’पांडेमोनियम’’ या मूळ इंग्रजी पुस्‍तकाचा पांडेपुराण हा मराठी अनुवाद.

‘’ऑगिल्वि एण्‍ड मेदर इंडिया एण्‍ड साऊथ एशिया’’ चे अध्‍यक्ष आणि क्रिएटिव डायरेक्‍टर असणा-या पीयूष पांडे यांचे हे पुस्‍तक सामान्‍य जनतेला माहिती नसलेल्‍या जाहिरातविश्‍वाचे अंतरंग आपल्‍यासमोर उलगडून दाखवते.   आपल्‍याला टी.व्‍ही.वर एक ते दोन मिनिटे दिसणा-या जाहिरातींमागे किती मोठा विचार असावा लागतो आणि किती लोकांचे कष्‍ट असतात हे लेखक आपल्‍याला सांगतात.  


जाहिरातीसाठी
‘’टॅग-लाइन’’ सुचण्‍यापासून तिच्‍या चित्रीकरणापर्यंत आणि तिथून ती लोकांना आवडेल अशा पद्धतीने मांडण्‍यापर्यंतचा प्रवास लेखक खूप छान उलगडून दाखवितात.

परंतु या जाहिरातविश्‍वाच्‍या पलीकडेही जाऊन पांडेपुराण हे पुस्‍तक आपल्‍याला व्‍यवस्‍थापनाचे धडेदेखील देते. आजच्‍या यूट्यूब आणि फेसबुकच्‍या युगात ‘’यशस्‍वी होण्‍याचे तीन मार्ग’’, ‘’२१ दिवसांत यशस्‍वी व्‍हा’’ किंवा ‘’तुमच्‍यामधील नेता शोधा’’ असे व्हिडिओ पाहून मोठं होता येईल, असे लोकांना वाटू लागले आहे.

व्‍हॉट्सएपवर नेतृत्‍व गुण कसे वाढवावेत किंवा मुख्‍य कार्यकारी अधिकारी कसे होता येईल वगैरे मेसेज पाठवून आणि वाचून प्रेरणा घेणा-यांना पीयूष पांडे सांगतात की

  • जर ‘’हे असं सगळं कागदावर मांडण्‍याइतकं सोपं असतं तर कुणीही उठला असता आणि सी.ई.ओ. झाला असता.’’ 
  • लेखक भारतीय व्‍यवस्‍थापन अभ्‍यासक्रम शिकवणा-या शिक्षण केंद्रांवर टीका करतात आणि सांगतात की, तिथे विद्यार्थ्‍यांना ‘’जसे आहेत तसं राहायला शिकवलंच जात नाही’’.
  • पुरस्‍कार जिंकणे हे ध्‍येय असू शकत नाही, तो फक्‍त मैलाचा एक दगड असतो हेही लेखक पटवून देतात.

आपल्‍या आयुष्‍यातील अनेक प्रसंग आपल्‍याला नकळत अनेक गोष्‍टी शिकवून जातात.  वेगवेगळे गुण असणा-या मित्र परिवारांचा आणि नातेवाईकांचा गोतावळ जर आपल्‍यासोबत असेल तर गुगलची गरजच काय? असे ते सांगतात.    

आपल्‍या परिसरातील प्रत्‍येक गोष्‍ट आणि प्रत्‍येक व्‍यक्‍ती आपला गुरू असतो हे लेखक उदाहरणे देऊन पटवून देतात.  

पुढे जाहिरातविश्‍वात पाऊल ठेवल्‍यानंतर एकत्र कुटुंबात वाढल्‍याने लहानपणी आलेले अनुभव कसे कामी आले हेही लेखक सांगतात.  अगदी लहानपणी घरी येणारे सुतार, चर्मकारदेखील ‘’पूर्ण समाधानी ग्राहकच तुमच्‍याकडे पुनःपुन्‍हा येणार असतो. ‘’ हा व्‍यवस्‍थापनातील मोठा पाठ शिकवतात आणि म्‍हणून आपल्‍या आयुष्‍यात येणा-या प्रत्‍येक व्‍यक्‍तीकडून आपण काहीतरी शिकायला हवे हे आपल्‍याला लेखक सांगतात. 

रणजी क्रिकेट खेळण्‍यापासून ते क्रिकेटच्‍या जाहिराती बनवण्‍यापर्यंत लेखकाचा प्रवास वाचकाला एक वेगळा दृष्टिकोन देतो.  दिल्‍ली विद्यापीठाच्‍या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेटच्‍या सामन्‍यात जेव्‍हा लेखकाच्‍या संघाची स्थिती ६ बाद ५३ अशी होती तेव्‍हा ‘’प्रत्‍येक अवघड गोष्‍टीमध्‍ये एक संधी दडलेली असते,’’ असे त्‍यांचा मित्र त्‍यांना सांगतो आणि लेखक आपल्‍या संघासाठी ७१ धावा जोडतात. 

पुढे लेखक सांगतात की, आयुष्‍यामध्‍ये जेव्‍हा कठीण प्रसंग येतो तेव्‍हा त्‍यांना ६ बाद ५३ हा आकडा आठवतो आणि ते पुन्‍हा त्‍याच्‍याशी सामना करून ७१ धावा करायला सज्‍ज होतात.  ही गोष्‍ट आणि प्रत्‍येक घटनेतून काहीतरी नवीन शिकण्‍याची ही लेखकाची प्रवृत्‍ती वाचकाला प्रेरित करते.

सोशल मीडियाच्‍या काळात आज जाहिरातींचे महत्‍वा वाढले आहे आणि त्‍यामुळे त्‍यांची भूमिकादेखील विस्‍तारली पाहिजे, असे लेखक सांगतात.  जाहिरात या माध्‍यमातून भ्रष्‍टाचार, महिला सुरक्षा, लैंगिक समानता इत्‍यादी सामाजिक विषय अधिक प्रभावीपणे मांडता येतील, असा विश्‍वास लेखक व्‍यक्‍त करतात. 

जाहिरातविश्‍वाबद्दलची माहिती आपल्‍या रोजच्‍या जीवनातून शिकता येणारे व्‍यवस्‍थापनाचे धडे आणि लेखकाचे समृद्ध अनुभव प्रत्‍येक पिढीतल वाचकाला नवीन दृष्टिकोन देतील.   पीयूष पांडे यांच्‍या मूळ इंग्रजी पुस्‍तकातील समृद्ध करणारा अनुभव, ‘’पांडेपुराण’’ या प्रसाद नामजोशींनी केलेल्‍या मराठी अनुवादात जसाच्‍या तसा उतरला आहे.

लेख-समीक्षक-अद्वैत शुक्‍ल- संपर्क-advaitshukla411@gmail.com पुण्‍यनगरी-ग्रंथसंग देई सदा

 

पुस्‍तकाचा तपशील

पुस्‍तक- पांडेपुराण

लेखक- पीयूष पांडे

मराठी अनुवाद- प्रसाद नामजोशी

प्रकाशक- मनोविकास प्रकाशन

मराठी पुस्‍तक समीक्षा

Pandemonium by Piyush Pande

पांडेपुराण या पुस्तकामध्ये पीयूष यांनी जयपूरच्या त्यांच्या बालपणापासून त्यांना प्रभावित करणार्‍या गोष्टी, रणजीपटू होईपर्यंतचा त्यांचा प्रवास, त्यांचं तत्त्वज्ञान, अपयश आणि जाहिरातींविषयी त्यांना मिळालेले धडे आणि आयुष्याविषयी निर्माण झालेला दृष्टिकोन, यांविषयी लिहिलेलं आहे.

भारतीय जाहिरातींचं चालतंबोलतं उदाहरण असलेल्या या व्यक्तिमत्त्वाच्या अंतर्मनात डोकावण्याची आणि त्यांच्या अलौकिक अशा सर्जनशील बुद्धीचा वेध घेण्याची संधी देणारं हे पुस्तक सुबोध, प्रेरणादायी आणि संपूच नये असं वाटणारं आहे.

#पांडेपुराण #पीयूष पांडे #मनोविकास प्रकाशन #पांडेमोनियम मराठी अनुवाद #मराठी पुस्‍तक #परिचय #समीक्षा #Piyush Pande #Pandemonium in #Marathi Book Review #Advertisement #Ads #Ad-Art #the art of Advertisement #जाहिरात आणि मी  

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

१.       रिच डॅड-पुअर डॅड

२.       रिच डॅड्स- गाईड टू इन्‍वेस्‍टींग

३.       रिच डॅड्स कॅशफ्लो क्‍वाड्रंट- गाईड टू फायनान्‍शि‍यल फ्रिडम

४.       रिच किड स्‍मार्ट किड

५.       हाऊ टू अट्रक्‍ट मनी

६.       द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन

👉इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍तक सारांश आवश्‍य वाचाः

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive