अफलातून मेंदू -डॉ. अनिल गांधी -मराठी पुस्‍तक परिचय | Aflatoon Mendu (Amazing Mind) Marathi by Anil Gandhi

या पुस्‍तकात मेंदूची रचना, कार्य याखेरीज मनाचे विकार, मेंदूचे आजार याविषयी ऊहापोह केला आहे.  तसेच ते टाळण्‍यासाठी किंवा लांबविण्‍यासाठी व्‍यायाम, आहार याविषयी माहिती दिली आहे.

आरोग्‍यसंपन्‍न, जीवनशैलीसाठी अंतर्दृष्‍टी जागृत करणारं पुस्‍तक

अफलातून मेंदू

डॉ. अनिल गांधी

 


मराठी पुस्‍तक परिचय

मेहता पब्लिशिंग हाऊस

 

माणसाचं मेंदू कोमल की कठोर अशी चर्चा असते, पण दोन्‍हींचा संबंध मेंदूशीच असतो, हृदयाशी नाही. मेंदू जिवंत तोपर्यंत मनाचेही अस्तित्‍व असते. मन अथांग आहे. त्‍याच्‍या विचारांना कल्‍पनाशक्‍तीला ना अंत आहे ना पार अशी परिस्थिती असते.

कोणाच्‍याही मनाचा थांग लागत नाही असा आजपर्यंतचा समजही शासकिय संशोधनाने फोल ठरविला आहे. आता मनुष्‍याच्‍या मेंदूत डोकावणे शक्‍य झाले आहे.  मनाचा थांग लागला आहे, इतकेच नव्‍हे तर दुस-याच्‍या मेंदूतील विचार समजून घेऊन त्‍यात बदल करयाचीही किमया साधी आहे.  अशा प्रकारे ख-या अर्थाने ब्रेन वॉशिंग शक्‍य झाले आहे.

या पुस्‍तकात मेंदूची रचना, कार्य याखेरीज मनाचे विकार, मेंदूचे आजार याविषयी ऊहापोह केला आहे.  तसेच ते टाळण्‍यासाठी किंवा लांबविण्‍यासाठी व्‍यायाम, आहार याविषयी माहिती दिली आहे.

मेंदू आणि मज्‍जारज्‍जुंचे ऍनन केफॅली, हायड्रोकेफॅलस, एन केफॅलोसील, मेनिंगोसील असे विकृती निर्माण करणारे किंवा अर्भकाचा अंत करणारे भयाण आजार अगदी साध्‍या उपायाने बहुतांशी टाळता येतात.  मातृत्‍व स्विकारण्‍याचा निर्णय होताच त्‍या स्‍त्रीने फॉलिक, ऍसिडची एक गोळी रोज घेणे (वर्षाचा खर्च केवळ 100 रूपये ( हा तो साधा उपाय आहे.  हे सांगणे हा या पुस्‍तकाचा प्रमुख हेतू आहे.

#आरोग्‍य #संपदा, #तन की बात, #मन की बात, #Beliefs of Brain-Body & Mind #Eastern and Indian Philosophy #Western and #Scientific #Spiritual #Psychological #Different Concepts of Mind

अफलातून मेंदूची रंजक माहिती... आपल्या शरीरातील सर्वांत कार्यक्षम अवयव कोणता, तसंच सर्वांत गूढ अवयव कोणता, या दोन्ही प्रश्नांचं उत्तर मेंदू असंच द्यावं लागेल. माणसाच्या सार्‍या भाव-भावना मेंदूतच निर्माण होतात. 
 
बुद्धी आणि प्रज्ञाच नव्हे तर जाणीव आणि नेणीव जिथं निर्माण होते तो म्हणजे मेंदू. सखोल विचार करायला सुरुवात केली, तर मेंदूची कार्य पाहिली, की चक्रावून जायला होतं. अजूनही मेंदूबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला नाही. जी आहे तीही मेंदूलाच मुंग्या आणणारी; पण त्याबाबत उत्सुकता-आकर्षण वाढवणारी आहे. 
 
आपल्याला अगदी लहानपणीच्या अनेक गोष्टी आठवतात; पण काल-परवा घडलेल्या घटना अनेकदा आठवत नाहीत. काही वेळा तर अगदी १०-१५ मिनिटांपूर्वी घडलेली घटनाही लक्षात राहत नाही. स्मरण आणि विस्मरणाचं केंद्रही आहे आपला मेंदूच! विश्वनिर्मितीच्या शोधाचं आव्हान जेवढं अवघड, तेवढंच अवघड मेंदूच्या मुळाशी जाणं आहे. मेंदूच्या विविध कार्याची ओळख अफलातून मेंदू या पुस्तकातून डॉ. अनिल गांधी यांनी करून दिली आहे.
 
मेंदू व मनाची रचना, कार्य, विकार यांची सविस्तर चर्चा डॉ. गांधी यांनी आपल्या पुस्तकातून केली आहे. मेंदू हे बुद्धिमत्तेचं केंद्र आहे; पण बुद्धिमत्ता म्हणजे काय, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. आधुनिक जगातला सर्वांत बुद्धिमान माणूस म्हणून प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांचं नाव घेतलं जातं, त्यांच्या प्रचंड बुद्धिमत्तेचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या मेंदूचे तुकडे करून जतनही करण्यात आले आहेत. 
 
अधिक वाचाः
 
त्यांचा अभ्यास अजूनही शास्त्रज्ञ करत आहेत. सुसंगतपणे विचार करण्याची, योजना आखण्याची, समस्या सोडवण्याची, अमूर्त पातळीवर विचार करण्याची, जटिल समस्या समजून घेण्याची, नवीन गोष्टी पटकन आत्मसात करण्याची, अनुभवातून शिकण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता अशी व्याख्या या क्षेत्रात काम करणार्‍या सुमारे ५२ शास्त्रज्ञांनी १९९७मध्ये केली. काहींनी यात स्मरणशक्तीचा अंतर्भाव केला. 
 
बुद्धिमत्तेचं प्रमुख नऊ प्रकारही करण्यात आले. या सगळ्याचा हेतू मेंदू समजून घेणं असाच होता. एवढ्या सगळ्या प्रयत्नांनंतरही मेंदूचं आपल्याला संपूर्ण आकलन झाल्याचं म्हणता येत नाही. मेंदूचा विकास वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत होतो. तोपर्यंत झालेल्या संस्काराच्या शिदोरीवर मेंदू आयुष्यभर काम करतो, असा दावाही संशोधकांनी आता केला आहे.
 
संगणकासह सर्व शास्त्रीय शोधांचा जनक हा मानवी मेंदूच आहे. मानवी मेंदूतली न्यूरल नेटवर्कसारखी रचना अत्याधुनिक संगणकात केल्यानं त्याचा वेग आणि कार्यक्षमता प्रचंड वाढली आहे. भाव-भावना, अनुभवाधारित निर्णयक्षमता संगणकाला साध्य होऊ शकत नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता संगणकात निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी माणसाची सर त्याला येणार नाही. 
 
मानवी मेंदूचं कार्य समजून घेण्यासाठी रिव्हर्स इंजिनिइंरगच्या पद्धतीनुसार मेंदूचा अभ्यास सुरू आहे; पण हा अभ्यासही अत्यंत प्राथमिक स्तरावर आहे, खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आपलं शरीर हे एका वाद्यवृंदासारखं आहे, असं गृहीत धरलं, तर त्याचा संचालक मेंदू आहे. संचालकाकडून चुकीच्या सूचना गेल्या किंवा संचालकाचा तोल गेला, की संपूर्ण शरीराचा तोल ढासळणारच. शारीरिक क्रियांखेरीज सर्व क्षमता, बुद्धीचे सर्व आविष्कार, विचार, भावभावना, स्मरणशक्ती, भाषा या सर्वांचा कर्ताकरविता मेंदूच आहे. 
 
 
डॉ. गांधी यांनी पुस्तकाची सुरुवात मेंदूवर घाला या विषयापासून केली आहे. आधुनिक साधनांद्वारे मेंदू हॅक करता येऊ शकतो का, हा याचा मध्यवर्ती विषय. त्यानंतर मेंदूची रचना, एकपेशीय जिवाणूंपासून वनस्पती, प्राणी व मनुष्य यांच्या मज्जासंस्थेची उत्क्रांती, अर्भकाच्या मेंदूची वाढ अशा सर्व विषयांचा ऊहापोह पुस्तकात केला आहे. माणसाच्या अथांग मनाचा थांग घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. त्यात लेखकानं शिक्षण, स्मरणशक्ती, नैपुण्यं आणि क्षमता या पैलूंवर प्रकाश टाकला आहे. 
 
वेदना सखी तू, नसे वैरिणी, अशा विचारांतून वेदना असली, तरी ती एक संवेदना आहे, हे उत्तमरितीनं समजावून सांगितलं आहे. मेंदूच्या आजार आणि विकारांवरही सविस्तर चर्चा केली आहे. गंभीर आजारांची माहिती देत असतानाही ती कुठंही फक्त शास्त्रीय न ठेवता सर्वसामान्यांना समजू शकेल, अशा भाषेत लिहिली आहे. 
 
धर्माची निर्मिती, उत्क्रांती, मोक्ष यांच्या चर्चेबरोबरच प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्यांचे अनुभव; बौद्ध भिक्खूंच्या मेंदूचा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केलेला अभ्यासाची माहिती देतानाच धर्म आणि शास्त्र यांची सांगड कशी घालता येते, यावर डॉ. गांधी यांनी भाष्य केले आहे. 
 
शास्त्रीय अचूक माहिती देताना ती कंटाळवाणी होणार नाही, याची दक्षता लेखकाने घेतली आहे. प्रत्येकाला आपल्या मेंदूची किमान माहिती असली पाहिजे. ती मिळविण्यासाठी हे पुस्तक वाचलंच पाहिजे. वैद्यकिय सामान्यज्ञान आणि माहितीचा संगम पुस्तकात आहे. सकारात्मक जीवनशैलीसाठी अंतर्दृष्टी या पुस्तकाद्वारे जागृत व्हावी, ही अपेक्षा! 
 
 #मनाचे बल, मनोबल
मेंदूविषयी अधिक इतर पुस्‍तक पुस्‍तक सारांश

अधिक वाचाः

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive